वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी प्रशासनाचा कडक उपाय; वाहनचालकांना नियम पाळण्याचे आवाहन
चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी):सचिन हाडके
जटपुरा गेट परिसरातील सातत्याने होणारी वाहतूक कोंडी आणि चुकीच्या दिशेने (Wrong Side) वाहन चालविल्यामुळे घडणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी या भागात ‘राँग साइड कटर’ (Spike Barrier) बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता विरुद्ध दिशेने वाहन नेणाऱ्या चालकांच्या वाहनांचे टायर थेट पंक्चर किंवा फाटणार आहेत.
जटपुरा गेट परिसरात अनेक वाहनचालक काही मिनिटांची घाई किंवा शॉर्टकट मारण्याच्या नादात वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अचानक अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढते; तसेच परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने कटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
योग्य दिशेने जाणाऱ्या वाहनांना धोका नाही
या कटर असलेल्या ठिकाणाहून विरुद्ध बाजूने वाहन नेल्यास रस्त्यावरील टोकदार 'स्पाईक्स'मुळे वाहनाचे टायर पंक्चर किंवा फाटू शकते. मात्र, निर्धारित व योग्य दिशेने जाणाऱ्या वाहनांना या कटरचा कोणताही त्रास होणार नाही. त्यामुळे वाहनचालकांनी रस्त्यावरील दिशादर्शक फलक आणि वाहतूक चिन्हांचे तंतोतंत पालन करूनच वाहन चालवावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा
चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना कटरमुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीसोबतच वाहतूक नियमांनुसार कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे.
‘सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करा’
"काही मिनिटांचा शॉर्टकट तुमच्या जीवावर बेतू शकतो. राँग साइडने वाहन चालविल्याने स्वतःसोबतच इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होतो. जटपुरा गेट परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहनचालकांनी निर्धारित मार्गाचाच वापर करून सहकार्य करावे."
— वाहतूक पोलीस विभाग, चंद्रपूर
प्रशासनाचा जनहिताचा संदेश:
‘राँग साइड टाळा, नियम पाळा आणि सुरक्षित प्रवास करा.’

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या