महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वर्धा शाखा अधिक गतिमान करणार: संजय बनसोडे
- राज्य कार्याध्यक्षांची वर्धा शाखेला पहिली भेट; ढोंगी बुवांच्या पर्दाफाशावर भर
वर्धा:
"महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ही पुरोगामी संत आणि विचारवंतांचे विचार समाजात रुजवून विवेकी, नीतिमान व शोषणमुक्त समाज निर्मितीचे ध्येय बाळगणारी जनचळवळ आहे. अंनिसचे देव किंवा धर्माशी कोणतेही वैर नाही; मात्र धर्म आणि देवाच्या नावाखाली चालणारी फसवणूक, लुबाडणूक आणि महिलांचे होणारे शोषण याला आमचा संविधानिक विरोध आहे," असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले.
विदर्भ दौऱ्यावर आलेले असताना ते वर्धा येथील वर्धन हाट झुनका भाकर केंद्राच्या सभागृहात आयोजित अंनिसच्या कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलत होते. अंनिसच्या वर्धा शाखेला दिलेली ही त्यांची पहिलीच भेट होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या अवघ्या सहा महिन्यांत राज्यभरात अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तब्बल ११३ ढोंगी बाबांचा भांडाफोड करून त्यांना कायद्याच्या कक्षेत आणले आहे. ही चळवळ जनतेला योग्य विचार करायला शिकवणारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारी आहे. त्यामुळे ही चळवळ अधिक संघटित करून यात तरुणांचा सहभाग वाढवावा आणि कार्य अधिक व्यापक करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
कार्यकर्त्यांशी संवाद व मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी मंचावर राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार आणि वर्धा शहर शाखेचे अध्यक्ष अरुण चवडे प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले, ज्यांना राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी समर्पक उदाहरणे देत सविस्तर उत्तरे दिली व उपस्थितांचे शंकासमाधान केले.
या संवाद बैठकीला प्रकाश कांबळे, डॉ. माधुरी झाडे, डॉ. मंजुषा देशमुख, डॉ. हरिश पेटकर, सारिका डेहनकर, दीपक कदम, सुनील ढाले, डॉ. शैलेश कदम, कल्पना सातव, कविता राठोड, रजनी सुरकार, द्वारकाताई इमडवार, दिलीप गुळघाणे, प्रतिभा ठाकूर, कविता लोहट, मारोतराव इमडवार, प्राचार्य डॉ. सुभाष खंडारे, संजय भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या