Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

सीसीटीव्ही फुटेज असूनही तपास अहवालात उल्लेख का नाही?

 



​दहेगाव गोसावी प्रकरणाची वरिष्ठ किंवा स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत पुनरतपासाची सचिन वाघे यांची मागणी

​प्रतिनिधी | दहेगाव गोसावी: सचिन हाडके

दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यात २९ मे २०२६ रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी निष्पक्ष आणि सखोल पुनरतपास करण्यात यावा, या मागणीसाठी सचिन वाघे यांनी ५ ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांऐवजी कोणत्याही वरिष्ठ किंवा स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत केली जावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

​या घटनेबाबत यापूर्वी वर्धा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसमोर वाघे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या तपास अहवालात पोलिसांनी स्वतःवर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत त्यात कोणतेही तथ्य आढळले नसल्याचा निष्कर्ष काढला होता. तसेच, ही तक्रार पोलिसांवर दबाव आणण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आल्याचा दावा वाघे यांनी केला आहे.

​सीसीटीव्ही फुटेजबाबत उपस्थित केले गंभीर प्रश्न

​या प्रकरणात घटनास्थळाचे महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) उपलब्ध असूनही पहिल्या तपास अहवालात त्याचा साधा उल्लेखही का करण्यात आला नाही? असा थेट सवाल वाघे यांनी उपस्थित केला आहे. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या कागदपत्रांनुसार आणि अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १८ ऑगस्ट २०२६ रोजी बाहेरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.

​सीसीटीव्ही फुटेजवरून घटनेच्या वेळची प्रत्यक्ष परिस्थिती स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे तपासादरम्यान या फुटेजची तपासणी करण्यात आली होती की नाही? फुटेजमध्ये दिसणाऱ्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख अहवालात का टाळण्यात आला? आणि उपलब्ध पुराव्यांचा पूर्वीच्या निष्कर्षांवर काय परिणाम झाला? या सर्व बाबींची नव्याने चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

​पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर पुन्हा जबाब नोंदवला

​पुनरतपासाच्या मागणीनंतर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या निर्देशानुसार ५ ऑक्टोबर रोजी वाघे यांचा पुन्हा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी तक्रारीत नमूद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्याची मागणी वाघे यांनी केली.

​सीसीटीव्ही फुटेज, माहितीच्या अधिकारातून मिळालेली कागदपत्रे आणि इतर उपलब्ध पुरावे तपासात समाविष्ट करून २९ मे च्या घटनेचे सत्य समोर आणावे, तसेच पूर्व तपास अहवालाच्या निष्कर्षांची पुनर्रचना करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

​दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही ते अहवालातून का गायब करण्यात आले? उपलब्ध पुराव्यांचा तपासात विचार झाला होता की नाही? या प्रश्नांची उत्तरे आता होणाऱ्या पुनरतपासात समोर येणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या