Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

समता सैनिक दलाचा ऐतिहासिक 'विशाल अभिवादन मार्च' नागपूरमध्ये संपन्न

 



​नागपूर :

समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि नागपूर धम्मक्रांती दिनाचे औचित्य साधून संविधान चौक ते दीक्षाभूमीपर्यंत समता सैनिक दलाचा प्रचंड विशाल अभिवादन मार्च उत्साहात संपन्न झाला. या शिस्तबद्ध परेडचे नेतृत्व मार्शल विलास नरांजे यांनी केले, तर संघटनेचे केंद्रीय संघटक मार्शल सुनील सारीपुत्त यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मार्च काढण्यात आला.

​या ऐतिहासिक सोहळ्यात केंद्रीय कमिटीमधील समता सैनिक दलाचे ॲड. प्रकाश दार्शनिक, राष्ट्रीय निमंत्रक मार्शल अशोक बोंदाडे, महाराष्ट्राचे संघटक मार्शल विजय वासनिक, आणि सह संघटक मार्शल मुकेश गजभिये प्रामुख्याने सहभागी झाले होते.

​विविध राज्यांचा व घटकांचा सहभाग

या मार्चमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, तेलंगणा, हैदराबाद, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील समता सैनिक आपापल्या राज्यांच्या शाखांचे बॅनर घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच निजामाबाद येथील श्रामणेर शिबिरातील असंख्य श्रामणेर भंते बुद्धघोष यांच्या नेतृत्वाखाली सामील झाले होते. या मार्चचे विशेष आकर्षण असलेले 'कॅसाब्लांका युनिट' या युनिटमधील शेकडो बालसैनिक विशेष गणवेशात सहभागी झाले होते. याशिवाय, समता सैनिक दलाच्या महिला रेजिमेंटच्या शेकडो महिला मार्शल कांचन वासनिक आणि मार्शल पूनम ढाले यांच्या नेतृत्वाखाली या मार्चमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

​'बी.टी. अॅक्ट १९४९ रद्द करा' ची मागणी

बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, बोधगया महाविहार मुक्ती राष्ट्रीय समितीच्या वतीने भंते धम्मशिखर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य भंतेजी आणि उपासक हातात 'बी.टी. अॅक्ट १९४९ रद्द करा' असे लिहिलेले फलक घेऊन सहभागी झाले होते.

​दीक्षाभूमीवर सांगता आणि शपथग्रहण

एक ते दीड किलोमीटर लांबीचा हा विशाल मार्च जेव्हा दीक्षाभूमीवर पोहोचला, तेव्हा भंते बुद्धघोष आणि मार्शल सुनील सारीपुत्त यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व मार्शल्सना समता सैनिक दलाची शपथ देण्यात आली आणि बावीस प्रतिज्ञांचा पुनरुच्चार करून मार्चची सांगता करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती मुंबईचे मार्शल अनिकेत उबाळे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या