वर्धा / धामणगाव : अश्विन बोंदाडे
समृद्धी महामार्गावर धामणगाव-पुलगावदरम्यान २ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पिकअप वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने अत्यंत जोरदार धडक दिली. वर्ध्यापासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर घडलेल्या या अपघातात पिकअप वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून २ ते ३ कार्यकर्त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
वर्ध्यातील अग्निहोत्री कॉलेजजवळील सोमनाथे लेआऊट येथील सुमारे २५ ते ३० कार्यकर्ते आगामी नवरात्रोत्सवासाठी शेगाव येथून दुर्गामूर्ती आणण्याकरिता गेले होते. मूर्ती घेऊन परतीच्या प्रवासात असताना समृद्धी महामार्गावरून जात असलेल्या पिकअप वाहनाला मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. अपघाताचा फटका एवढा भीषण होता की, काही कार्यकर्ते थेट महामार्गाच्या कडेला लांब फेकले गेले.
मध्यरात्री पोलीस आणि बचाव पथकाकडून शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि मदत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघात मध्यरात्री दीडच्या सुमारास घडल्यामुळे आणि परिसरात दाट अंधार असल्याने महामार्गाच्या बाजूला फेकल्या गेलेल्या कार्यकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली.
जखमींवर उपचार सुरू
अपघातातील सर्व जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जवळच्या शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत २ ते ३ जणांचा मृत्यू झाला आहे, मात्र अंधार व गोंधळाच्या वातावरणामुळे मृत आणि जखमींचा अचूक आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या