Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

जनता नगर येथील अंडरग्राउंड नालीचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा

 



​युवासेनेचे वर्धा लोकसभा प्रमुख सूर्या हिरेखन यांची नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी

​आर्वी (विशेष प्रतिनिधी):

शहरानजीकच्या जनता नगर परिसरातील अंडरग्राउंड नालीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असून, ते वेळेत पूर्ण होत नसल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा आणि त्रासाचा सामना करावा लागत आहे. आगामी सण-उत्सव लक्षात घेता सदर काम तातडीने युद्धपातळीवर सुरू करून पूर्ण करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी युवासेना वर्धा लोकसभा प्रमुख सूर्या प्रभाकरराव हिरेखन यांनी केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, श्री. दिलीपराव वरुडकर यांच्या घराजवळून एक मोठा नाला गेला असून, संपूर्ण साईनगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील कचरा, घाण व सांडपाण्याचा प्रवाह याच ठिकाणी एकत्र येतो. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

​नवरात्री उत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी

येत्या काही दिवसांत नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या कालावधीत मंदिरात व परिसरात भाविक तसेच नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत नालीचे काम असेच रखडलेले राहिल्यास भाविकांना व नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.

​या पार्श्वभूमीवर, संबंधित ठेकेदार ‘यश कन्स्ट्रक्शन’ यांना नगरपरिषद आर्वीच्या माध्यमातून तातडीने कडक सूचना देण्यात याव्यात आणि अंडरग्राउंड नालीचे रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

​नागरिकांचे आरोग्य, परिसरातील स्वच्छता आणि आगामी नवरात्री उत्सव लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही या वेळी देण्यात आला.

​निवेदन देतेवेळी युवासेना वर्धा लोकसभा प्रमुख सूर्या प्रभाकरराव हिरेखन यांच्यासह उमेशजी वरुडकर, अरविंदजी गोमासे, शैलेशजी माहुरे, जनार्धनजी काटणकर, शुभम नाकतोडे, संकेत नाकतोडे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​रिपोर्टर: अर्पित वाहाणे (मो. ८९५६६४७००४)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या