देवळी (जिल्हा प्रतिनिधी): सचिन हाडके
येथील पोलीस स्टेशनने 'ऑपरेशन मुस्कान १४' अंतर्गत अत्यंत प्रभावी कामगिरी करत एका बेपत्ता मुलीचा अवघ्या दोन तासांत शोध लावून तिला पालकांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका कुटुंबाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले असून परिसरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी २०२५ रोजी देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा सरूळ येथील एक मुलगी रात्रीच्या सुमारास घरातून निघून गेली होती. ही माहिती १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रभारी ठाणेदार संदीप कापडे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.
पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव व त्यांच्या पथकाने मुलीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजची अत्यंत बारकाईने तपासणी केली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मुलीचा अवघ्या दोन तासांत शोध लागला. पोलिसांनी तिला सुखरूप पोलीस स्टेशनला आणले.
मुलीने अभ्यासाच्या कारणावरून घर सोडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. यानंतर, जिल्हा बाल कल्याण अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून आणि मुलीचे योग्य समुपदेशन करून तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात प्रभारी ठाणेदार संदीप कापडे, पोउपनि शिवराज जाधव, ग्रे.पोउपनि निमजे, पो.शी. पंकज चामचोर, म.पो.शी. प्रियंका तायवाडे आणि चालक पो.शी. फिरोज पठाण यांचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या