Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

बाजारवाडा-हरदोली शिवारातील गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त करा!

 



युवासेना जिल्हा प्रमुख महेश चौधरी यांची पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्याकडे आक्रमक मागणी

विशेष बातमी प्रतिनिधी : अर्पित वाहाणे (मो. ८९५६६४७००४)

वर्धा / आर्वी:

बाजारवाडा आणि हरदोली या दोन्ही गावांच्या मध्यभागी असलेल्या घनदाट जंगलाचा गैरफायदा घेत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गावठी दारूच्या भट्ट्या धगधगत आहेत. या अवैध व्यवसायावर तात्काळ कठोर कारवाई करून या परिसरातील सर्व दारूच्या भट्ट्या मुळासकट उध्वस्त कराव्यात, अशी जोरदार मागणी युवासेना जिल्हा प्रमुख महेश चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी वर्धा येथील पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुलांचे भवितव्य धोक्यात; ट्यूबने चालतेय दारूची वाहतूक

ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांचा वापर उघडपणे दारू वाहतुकीसाठी केला जात आहे. विशेष म्हणजे ही दारू ग्लासाने किंवा बाटल्यांनी नव्हे, तर चक्क मोठ्या ट्यूबमध्ये भरून विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दारूच्या आहारी जाऊन गावातील लहान मुले आणि तरुण पिढी पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. हा केवळ कोणताही लहान-मोठा व्यवसाय नसून एका मोठ्या रॅकेटच्या माध्यमातून जंगलात हा काळा धंदा सुरू आहे. प्रशासनाचे याकडे होणारे दुर्लक्ष संशयास्पद असून, नक्की कोणाच्या आशीर्वादाने या भट्ट्या चालू आहेत? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

उत्सवावर दारुड्यांचे सावट; कीर्तन आणि सार्वजनिक कार्यक्रमांना धोक्याची शक्यता

सध्या सर्वत्र पोळा, महालक्ष्मी आणि गणेशोत्सवाचा उत्साह आहे. बाजारवाडा गावातही गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, गावाच्या शिवारात सुरू असलेल्या या अवैध दारूच्या व्यवसायामुळे उत्सवाच्या काळात मद्यधुंद समाजकंटक विघ्न निर्माण करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

आर्वी पोलीस ठाण्याला तात्काळ आदेश देण्याची मागणी

"गणेशोत्सवासारख्या पवित्र सणात गावात कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि तरुण पिढी या व्यसनाधीनतेपासून वाचावी, यासाठी आर्वी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना तात्काळ निर्देश द्यावेत. पोलीस पथक पाठवून बाजारवाडा-हरदोली परिसरातील दारूच्या भट्ट्यांवर धाडी टाकून त्या कायमच्या नष्ट कराव्यात."

महेश चौधरी (जिल्हा प्रमुख, युवासेना वर्धा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या