Type Here to Get Search Results !

Vanchit Varta 24 news

Vanchit Varta 24 news

वर्धा पोलिसांच्या कथित मनमानीविरोधात उच्च न्यायालयात याचिका; उद्या लोकमान्य हॉटेलमध्ये पत्रकार परिषद

 


वर्धा: (बातमीदार)अर्पित वाहने

वर्धा पोलीस प्रशासनाची मनमानी, सामाजिक कार्यकर्त्यांवरील कथित अत्याचार आणि त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका (Criminal Writ Petition No. 690/2026) दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सर्व पुरावे आणि सत्य जनतेसमोर आणण्यासाठी उद्या, मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता इतवारा चौक येथील लोकमान्य हॉटेलमध्ये विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

​वीर अशोक सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विक्की महेंद्र सवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता, जिल्हाधिकाऱ्यांचे अंगरक्षक क्षितिज रोकडे यांनी मारहाण करून ३० हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतला. याप्रकरणी तक्रार देण्यास गेले असता वर्धा शहर पोलीस ठाण्यात तत्कालीन ठाणेदार पराग पोटे, राम ढगे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत फिर्यादीवरच रात्री २ वाजता खोटा गुन्हा दाखल करून त्यांना लाकअपमध्ये डांबले. तसेच तपास अधिकारी सिन्नू कुमार बानोत यांनी पोलीस कोठडीत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

​याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी, मानवाधिकार आयोग व अनुसूचित जमाती आयोगाकडे १० ते १२ तक्रारी देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही. उलटपक्षी, ११ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे आरोपी पोलिसांवर कारवाईसाठी अर्ज दिल्यानंतर त्याच रात्री रामनगर पोलीस ठाण्यात दुसरा खोटा गुन्हा (FIR No. 0722/2026) दाखल करण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

​उच्च न्यायालयात दाखल याचिकेत रामनगर पोलीस ठाण्यातील खोटा गुन्हा रद्द करणे, संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करणे, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवणे आणि भरपाई देण्याची मुख्य मागणी करण्यात आली आहे.

​या संपूर्ण प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय पुरावे आणि इतर कागदपत्रांसह पत्रकारांसमोर माहिती मांडण्यात येणार असून, सर्व वृत्तपत्र व बातमीदारांनी या पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक विक्की सवाई (मो. ९४२२३५९६५७) आणि अर्पित वाहाणे (मो. ८९५६४७००४) यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या