मुख्य संपादक: सचिन हाडके (8408814471)
हिंगणघाट: आबालवृद्धांचे लाडके दैवत असलेल्या श्री गणरायाचे आज घरोघरी आणि विविध सार्वजनिक मंडळांमध्ये अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात आगमन झाले. सकाळी ब्राह्ममुहूर्तावर वेदघोषाच्या आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात श्रींची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी हिंगणघाट शहर व परिसरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक देखावे, भव्य मखर आणि नेत्रदीपक रोषणाईची तयारी केली आहे. आगमन मिरवणुकांमध्ये पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे वादन आणि गुलालाची उधळण यामुळे संपूर्ण शहर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.
नागरिकांनी बाजारपेठेत मूर्ती, पूजा साहित्य आणि सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील दहा दिवस विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आणि आरतीच्या सुरांनी हिंगणघाट शहर दुमदुमून निघणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या