पुलगाव (विशेष प्रतिनिधी): अर्पित वाहणे
मोटारसायकल दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर आणि त्यांच्या पत्नीवर लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण केल्याची घटना देवळी तालुक्यातील गुंजखेडा येथे घडली आहे. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार वासुदेव मारोतराव केवटे (वय ४८ वर्ष, रा. वॉर्ड क्र. ३, गुंजखेडा, ता. देवळी) हे १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजताच्या सुमारास स्वतःच्या घरासमोर उभे होते. त्यावेळी त्यांची मोटारसायकल खराब झाल्याने दुरुस्त करण्यासाठी गावातील दिनेश सूर्यवंशी याला बोलावले होते.
तक्रारदार रस्त्यावर थांबले असताना, समोर राहणारे यशवंत धुर्वे व त्यांची पत्नी सीमा धुर्वे तेथे आले. "तू आमच्या घरासमोर जाण्या-येण्याचा रस्ता बंद करत आहेस, गाडी इथे का उभी केली?" असा जाब विचारत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हिंसेत होऊन आरोपी यशवंत धुर्वे यांनी हातात असलेल्या लाकडी काठीने वासुदेव केवटे यांच्या डोक्यावर, पाठीवर व हातावर जबर मारहाण केली.
तक्रारदारांचा आवाज ऐकून त्यांची पत्नी मध्यस्थी करण्यासाठी बाहेर आली असता, आरोपी सीमा धुर्वे यांनी त्यांनाही हाताने व लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच "पुढे जर आमच्याशी वाद घातला तर तुम्हा दोघांना जिवंत मारून टाकू," अशी गंभीर धमकीही दिली.
या मारहाणीत वासुदेव केवटे व त्यांची पत्नी जखमी झाले असून, उपचारांनंतर त्यांनी पुलगाव पोलीस ठाण्यात जाऊन आपबिती सांगितली व लेखी तक्रार नोंदवली.
वासुदेव केवटे यांच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी आरोपी यशवंत धुर्वे व सीमा धुर्वे (दोघे रा. गुंजखेडा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव चंदार ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या